पदवीधर निवडणुकीतील यशाचे रहस्य : भाग १
डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना ४ ऑक्टोबरला उमेदवारी मिळाली, २३ ऑक्टोबरला मतदान झाले आणि २९ ऑक्टोबरला त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. बाहेरून पाहणाऱ्यांना हा अवघ्या पंचवीस दिवसांचा प्रवास वाटू शकतो. मात्र, त्यांच्या कामाचा आणि जनसंपर्काचा जवळून साक्षीदार म्हणून मला एवढे निश्चितपणे सांगता येईल की, हा विजय पंचवीस दिवसांत घडलेला नाही; तो वर्षानुवर्षे माणसे जोडण्याच्या, त्यांना सन्मान देण्याच्या आणि अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या वृत्तीचे फलित आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक चांगुलपणावर आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कावर विश्वास कायम ठेवणारी ठरली आहे.
सुरुवातीची जोडणी आणि पुढील वाटचाल
साधारणतः २००५ ते २०१२ या काळापासून भैय्यासाहेबांची विविध क्षेत्रांतील माणसांशी जोडणी होत होती. शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून परिचयाचे वर्तुळ विस्तारत गेले. पुढे २०१३ पासून या जनसंपर्काला अधिक जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण दिशा मिळाली.
लोकांच्या प्रश्नांची व्यापक पातळीवर सोडवणूक करायची असेल, तर घटनात्मक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची भूमिका आकार घेत गेली. त्यासाठी लोकांमध्ये राहणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि विश्वासाची सहकाऱ्यांची फळी उभी करणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले.
धाराशिव जिल्ह्यात स्वतःची राजकीय पार्श्वभूमी नसताना आपली ओळख निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी निवडला—लोकांमध्ये मिसळण्याचा आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा.
सामान्य माणसाला दिलेला मान
गणेशोत्सव मंडळे असोत, नवरात्र महोत्सव असोत, महिला मेळावे असोत, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असोत किंवा गुणवंतांचा सत्कार असो; भैय्यासाहेब सातत्याने लोकांपर्यंत पोहोचत राहिले.
माझ्या निरीक्षणात त्यांच्या जनसंपर्काचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य माणसाला दिलेला सन्मान. व्यासपीठावरील मोठ्या व्यक्तीइतकाच समोर उभा असलेला सामान्य कार्यकर्ताही महत्त्वाचा आहे, ही भावना त्यांच्या वागण्यात दिसत असे.
२०१४ ते २०१९ या काळातील एक गोष्ट मला विशेष आठवते. कितीही सामान्य कार्यकर्ता असला, तरी वाढदिवसाच्या दिवशी त्याला भैय्यासाहेबांचा फोन आलेला असायचा. तो आपल्या पक्षाचा आहे की दुसऱ्या पक्षाचा, यावर त्यांनी माणसाची किंमत ठरवली नाही.
त्या काळात सामान्य कार्यकर्त्याला स्वतःहून फोन करून शुभेच्छा देण्याची पद्धत किती नेत्यांकडे होती, याचा विचार केला पाहिजे. भैय्यासाहेबांनी मात्र ती सहजपणे आपल्या दिनक्रमाचा भाग बनवली. सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस लक्षात ठेवून त्याला मान देण्याची ही पद्धत पुढे त्यांच्या जनसंपर्काची खास ओळख ठरली.
मान द्या, मान मिळवा’ हे तत्त्व त्यांनी भाषणातून सांगण्यापेक्षा आपल्या वागण्यातून जपले.
‘स्टेटस’पेक्षा माणसांना महत्त्व
अनेकांच्या दुकानांची उद्घाटने, छोटेखानी व्यवसायाचा शुभारंभ, वास्तुशांती, घरगुती समारंभ किंवा अगदी छोटासा स्थानिक कार्यक्रम—निमंत्रण मिळाले आणि शक्य झाले, की भैय्यासाहेब उपस्थित राहत.
त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहता, काही लोकांना हे आश्चर्याचे वाटायचे. अनेक जण त्यांना स्पष्टपणे सांगायचे, “भैय्यासाहेब, तुम्ही अशा बारीकसारीक कार्यक्रमांना जात जाऊ नका. आपले स्टेटस सांभाळले पाहिजे!”
पण त्यांनी माणसांना भेटताना ‘स्टेटस’ची मोजपट्टी वापरली नाही. एखाद्यासाठी दुकानाचे उद्घाटन ही त्याच्या आयुष्यातील मोठी सुरुवात असते; वास्तुशांती हा कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीचा क्षण असतो. आपल्याला छोटा वाटणारा कार्यक्रम संबंधित माणसासाठी किती मोठा असू शकतो, हे त्यांनी समजून घेतले.
याच उपस्थितीवरून टोमणे मारणारी माणसेही होती. “आता फक्त बारशाला जाणे तेवढे राहिले!” असे बोललेले मी स्वतः ऐकले आहे. मात्र, अशा बोलण्याला उत्तर देण्यात त्यांनी वेळ घालवला नाही. लोकांशी जोडलेले राहण्याचा आपला स्वभाव कायम ठेवला.
आज मागे वळून पाहताना जाणवते की, त्या छोट्या कार्यक्रमांतील उपस्थितीने मोठी नाती निर्माण केली. निमंत्रणाला दिलेला मान माणसांच्या लक्षात राहिला आणि योग्य वेळी त्याच माणसांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्या नात्याची जाणीव करून दिली.
मदतीतून निर्माण झालेला विश्वास
जनसंपर्क म्हणजे केवळ कार्यक्रमाला हजेरी लावणे किंवा फोटो काढणे एवढाच विषय नाही. त्याची खरी कसोटी माणूस अडचणीत असताना लागते.
कुणाला रुग्णालयासाठी मदत लागली, कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, तर कुणी वैयक्तिक अडचणीमुळे भेटायला आले—अशा अनेक प्रसंगांत भैय्यासाहेबांनी शक्य ती मदत केली. या मदतीच्या आठवणी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात राहिल्या.
निवडणुकीच्या वेळी या नात्यांचे महत्त्व स्पष्टपणे दिसले. अनेकांनी केवळ पक्ष पाहून भूमिका घेतली नाही; आपल्या आयुष्यात कोण माणूस उभा राहिला होता, हेही त्यांनी लक्षात ठेवले.
उमेदवारीच्या अनिश्चिततेतही संयम
उमेदवारीबाबत पक्षपातळीवर हालचाली सुरू झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील अंतिम समन्वयाची प्रतीक्षा होती. ४ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची दिशा स्पष्ट झाली; मात्र पुढील बैठका आणि निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या काळात मलाही अनेकांचे फोन येत होते. “यावेळी भैय्यासाहेबांना सांगा, कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा नाही,” अशी भावना अनेक जण व्यक्त करीत होते.
या परिस्थितीत भैय्यासाहेबांनी दाखवलेला संयम महत्त्वाचा होता. भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी संवाद सुरू ठेवला. दीर्घकाळ जोडलेल्या माणसांवरील विश्वास आणि सहकाऱ्यांची साथ यामुळे ते स्थिर राहिले.
मतदार नसलेली माणसेही प्रचारात उतरली
या निवडणुकीतील एक वैशिष्ट्य मला विशेष जाणवले. भैय्यासाहेबांसाठी धावणारी अनेक माणसे स्वतः पदवीधर मतदार नव्हती. तरीही त्यांनी मतदारांचा शोध घेतला, त्यांच्याशी संपर्क साधला आणि भैय्यासाहेबांविषयी आपला अनुभव सांगितला.
वेगवेगळ्या पक्षांत काम करणारे कार्यकर्तेही यामध्ये होते. त्यांनी आपल्या परिचयातील पदवीधरांपर्यंत पोहोचून, “हा माणूस चांगला आहे; याला संधी मिळाली पाहिजे,” अशी भूमिका मांडली.
वर्षानुवर्षे जोडलेली माणसे स्वतःहून आपल्या बाजूने बोलू लागतात, तेव्हा जनसंपर्काचे खरे बळ समोर येते. भैय्यासाहेबांच्या बाबतीत हे घडताना आम्ही पाहिले.
व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या कामावर विश्वास
त्यांच्या स्वभावातील आणखी एक गोष्ट मला सातत्याने जाणवली—कुणाचा अपमान करून किंवा व्यक्तिगत आयुष्यावर भाष्य करून स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.
मतभेद असले, तरी व्यक्तीला दुखावणारी भाषा टाळण्याकडे त्यांचा कल राहिला. आपण आपले काम चांगले करावे, आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि पुढे चालत राहावे, ही त्यांची भूमिका आहे.
राजकारणात संयम राखणे आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ न देणे सोपे नसते. पण याच स्वभावामुळे वेगवेगळ्या विचारांची माणसे त्यांच्याशी जोडलेली राहिली.
विजयाचा विश्वास आणि माझा अंदाज
आमच्या टीममध्ये विजयाबाबत ठाम विश्वास होता. आपण पराभूत होऊ, अशी भावना सहकाऱ्यांमध्ये नव्हती. प्रश्न होता तो मताधिक्याचा.
माझा स्वतःचा अंदाज जवळपास तीस हजार मतांच्या विजयाचा होता. त्यामागे आमच्या संपर्कातून मिळालेली माहिती आणि त्यावर केलेले आकलन होते. प्रत्यक्ष निकालात भैय्यासाहेबांनी १८ हजार १२४ मतांनी विजय मिळवला.
माझ्या अंदाजापेक्षा रविराज साबळे यांना अधिक मते मिळाली. तसेच सुशील घुटे आणि दिलीप घुगे यांच्यासह इतर उमेदवारांकडेही मते गेली. प्रस्थापितांविषयी नाराजी असलेल्या मतदारांचा कल विविध उमेदवारांकडे विभागला गेला असावा, असे माझे वैयक्तिक आकलन आहे. ही मते एकाच उमेदवाराकडे आली असती, तर निकालाचे गणित वेगळे असू शकले असते; मात्र त्याबाबत निश्चित दावा करता येणार नाही.
तरीही मिळालेला विजय स्पष्ट होता. मतदारांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
पंचवीस दिवसांच्या मागची अनेक वर्षे
आज भैय्यासाहेब आमदार म्हणून दिसत आहेत; मात्र त्यांच्या या यशामागे हजारो सहकाऱ्यांचे हात, अनेक कुटुंबांच्या सदिच्छा आणि वर्षानुवर्षे जपलेली नाती आहेत.
ज्यांना हा प्रवास तेरा-चौदा दिवसांचा, वीस दिवसांचा किंवा पंचवीस दिवसांचा वाटतो, त्यांनी त्यामागची वर्षेही पाहिली पाहिजेत. सातत्याने केलेला जनसंपर्क, सामान्य माणसाला दिलेला सन्मान, अडचणीच्या वेळी केलेली मदत आणि टीका सहन करूनही लोकांमध्ये राहण्याची तयारी—यातून या विजयाचा पाया तयार झाला.
दुकानाच्या उद्घाटनाला गेलेले पाऊल, वास्तुशांतीला दिलेली उपस्थिती, वाढदिवसाला केलेला फोन आणि अडचणीच्या वेळी दिलेला आधार—या प्रत्येक कृतीतून विश्वास साचत गेला. पदवीधर निवडणुकीत त्याच विश्वासाला मतांचे रूप मिळाले.
माझ्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या विजयाचे पहिले रहस्य हेच आहे—माणसांना मनापासून मान द्या, त्यांच्या आयुष्यात सहभागी व्हा आणि आपले काम सातत्याने करत राहा. चांगुलपणाची आणि जनसंपर्काची ही पेरणी कधीतरी नक्कीच फळ देते!
प्रा. सतिश बबनराव मातने
संपादक – राजकीय कट्टा
प्राचार्य – भैरवनाथ अध्यापक विद्यालय, कळंब

Post a Comment
0 Comments