Type Here to Get Search Results !

​प्रा. राजीव शाळू सरांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; प्रतिभा निकेतन मध्ये उत्साहात सेवापूर्ती सोहळा संपन्न



तेरणा काठ वृत्तसेवा --- मुरुम येथील प्रतिष्ठित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. राजीव शाळू यांनी ३१ वर्षे ३ महिने शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने व निष्कलंक सेवा बजावली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेच्या निमित्ताने विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (ता. २) त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे हे होते. यावेळी बोलताना प्राचार्य घुरघुरे म्हणाले, प्रा. शाळू यांनी आपल्या सेवाकाळात केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांत देशपातळीवर उल्लेखनीय कार्य करणारे कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास हा भावी पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

​या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे, इरफान मुजावर, पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी प्राचार्य सच्चितानंद अंबर, काशिनाथ मिरगाळे, के. के. ब्याळे यांच्यासह परिसरातील आजी-माजी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​प्रारंभ स्वर्गीय माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र गीताने करण्यात आली. उपस्थित सर्वमान्यवरांच्या हस्ते प्रा. राजीव शाळू यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना कै. माधवराव पाटील यांची प्रतिमा भेट व पुढील यशस्वी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

 लक्ष्मी गाडेकर, सरोज गाडेकर, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. अजित सूर्यवंशी, इरफान मुजावर आणि के. के. ब्याळे यांनी आपल्या मनोगतातून प्रा. शाळू यांच्या कष्टाळू स्वभावाचा आणि उत्कृष्ट अध्यापनशैलीचा गौरव केला.

​सत्काराला उत्तर देताना प्रा. राजीव शाळू यांनी आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील सुखद आठवणी व विविध अनुभवांना उजाळा दिला. शिक्षक म्हणून काम करताना लाभलेले सहकारी, विद्यार्थी आणि संस्थेने वेळोवेळी दिलेले बहुमूल्य सहकार्य याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य उमाकांत महामुनी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सलीम जमादार तर प्रा. धर्माधिकारी राघवेंद्र यांनी आभार मानले. विद्यालयातील प्राध्यापक, सहशिक्षक, मित्रपरिवार, आप्तिष्ट-नातेवाईकांनी प्रा. शाळू सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा यथोचित सत्कार केला.


 

Post a Comment

0 Comments