Type Here to Get Search Results !

धाराशिव तहसीलदार ॲक्शन मोडवर ::: अभिलेख कक्षाच्या कामकाजावर तहसीलदारांची गंभीर दखल;



महसूल सहाय्यक प्रतिभा उंबरे यांच्याकडील अभिलेखपाल पदाचा पदभार तात्काळ काढला!

तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाच्या कामकाजासंदर्भात प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओची तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी असल्याचे व्हिडिओच्या अवलोकनातून निदर्शनास आल्याचे नमूद करत, प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी कार्यालयप्रमुख या नात्याने महसूल सहाय्यक श्रीमती प्रतिभा उंबरे यांच्याकडील अभिलेखपाल पदाचा पदभार तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अभिलेख कक्षाचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवासी नायब तहसीलदार महादेव शिंदे यांना पर्यायी कर्मचारी व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

**कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश* 

 प्रतिभा उंबरे यांच्या अभिलेखपाल पदाच्या कामकाजाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्याचे निर्देश आस्थापना शाखेला देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



 *अभिलेख कक्षाची तपासणी करून आजच अहवाल मागविला* 

या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासण्यासाठी अपर तहसीलदार श्रीमती श्रद्धा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवासी नायब तहसीलदार आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे अभिलेख कक्षाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल त्याच दिवशी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आपल्या आदेशात, प्रसारित व्हिडिओमुळे धाराशिव तहसील कार्यालयाची तसेच एकूणच महसूल प्रशासनाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचे स्पष्ट मत नोंदविले आहे.

दरम्यान, अभिलेखपाल पदाचा पदभार काढून घेणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे आणि प्रत्यक्ष तपासणी अहवाल मागविणे या कार्यवाहीमुळे या प्रकरणाकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने पाहिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता संबंधित कर्मचाऱ्यांचा खुलासा आणि तपासणी अहवालानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments