Type Here to Get Search Results !

शिक्षक दाम्पत्यांचे समर्पण जिल्हा परिषद शाळा बनली नंदनवन



तेरणा काठ वृत्तसेवा --- वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थीसंख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्या अवघ्या 8 वरून २३ वर पोहोचली असून, लोकवर्गणीतून शाळेत विविध भौतिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ही शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजू लागली आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरी गाव आहे. कमी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात केवळ आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळा सुरू ठेवण्यासाठी किमान २१ विद्यार्थ्यांची आवश्यकता असल्याने शाळेचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये कळंब तालुक्यातील नाथवाडी येथून श्रीमती शितल सोळुंके आणि दिवाणे शेलगाव येथून सुधीर देशमुख या शिक्षक दाम्पत्याने बोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा पदभार स्वीकारला. यापूर्वी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप मिळालेल्या या शिक्षकांनी बोरीच्या शाळेचा शैक्षणिक कायापालट करण्याचा निर्धार केला.

ग्रामस्थांशी संवाद साधत पटसंख्या वाढविली

पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थ आणि पालकांशी संवाद साधून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच शाळेतील वातावरण आनंददायी व विद्यार्थीकेंद्रित करण्यावर भर देण्यात आला. पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश मिळाले असून, आठ विद्यार्थी असलेली पटसंख्या आता २३ वर पोहोचली आहे.


जुनी शाळा 

विद्यार्थीसंख्या वाढविण्याबरोबरच शाळेतील भौतिक सुविधांकडेही लक्ष देण्यात आले. शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक वर्गात लाईट व पंखे बसविण्यात आले. शाळेसमोरील प्रांगणातील खड्डे नळ्या टाकून बुजवून परिसराची दुरुस्ती करण्यात आली.

रोटरी क्लबच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्रामस्थांच्या मालकीच्या बोअरवेलमधून या टाकीत पाणीपुरवठा केला जात आहे. लोकवर्गणीतून शाळेसमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यासह संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे शाळेचे रूपडेच पालटले आहे.

शिक्षक दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांसाठी पूरक उपक्रम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेत शिक्षक दाम्पत्याकडून स्वखर्चाने पूरक आहार म्हणून विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नियमित उपस्थितीची सवय निर्माण व्हावी, यासाठी ‘माझी उपस्थिती–माझी जबाबदारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिनाभर दररोज शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला शिक्षकांकडून स्वखर्चाने वस्तुरूप बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षक दाम्पत्य, पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातून बोरी येथील जिल्हा परिषद शाळेला नवसंजीवनी मिळत आहे. ‘आपली शाळा, आपली जबाबदारी’ या भावनेतून ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल ग्रामीण भागातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments