तेरणा काठ वृत्तसेवा --- कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार थेट महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर कळंब व वाशी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये *दिनांक 11 सप्टेंबर 2026 आणि 16 सप्टेंबर 2026 रोजी* विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यात झालेल्या तपासणीअंती कळंब उप विभागातील कळंब तालुक्यात एकूण *651 तर वाशी तालुक्यात एकूण 20 कुणबी नोंदी* आढळून आल्या आहेत. या नोंदींची तालुकानिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या *dharashiv.nic.in* या संकेतस्थळावर तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.कळंब उपविभागांतर्गत आज अखेर पर्यंत कळंब तालुक्यातून एकूण *6706 अर्ज* प्राप्त झाले त्यापैकी *6705 जात प्रमाणपत्रे* निर्गमित करून नागरिकांना त्यांचे वितरण करण्यात आलेले असून केवळ 1 अर्ज पुराव्याअभावी नामंजूर झालेला आहे. तसेच वाशी तालुक्यातून एकूण *1054 अर्ज* प्राप्त झाले असून त्यापैकी *1054 जात प्रमाणपत्रे* निर्गमित करून नागरिकांना त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे.
तरी ज्या नागरिकांच्या जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत, अशा पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित महसूल मंडळात मंडळ स्तरावर आयोजित केलेल्या शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास नागरिकांनी तहसील कार्यालय कळंब / वाशी अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे संपर्क साधावा.
गणेश शिंदे
. उप विभागीय अधिकारी, कळंब*

Post a Comment
0 Comments