तेरणा काठ वृत्तसेवा : राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक आणि गुंजोटी येथील सुपुत्र दीपक येवते यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल AGC न्युजचे संपादक आकाश चव्हाण यांच्या हस्ते दीपक येवते यांचा सत्कार करण्यात आला.
नरचर अँड पीस फाउंडेशन, दिल्ली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दीपक येवते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल या माध्यमातून घेण्यात आली.
समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत दीपक येवते यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या मेहनत व समर्पणाची पावती मानली जात आहे.
गुंजोटी गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. AGC न्युजचे संपादक आकाश चव्हाण यांनी येवते यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील सामाजिक व प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments