Type Here to Get Search Results !

मांडव्यात एलसीबीच्या धाडीत 22 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले; चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे ते आरोपीही जाळ्यात



तेरणा काठ वृत्तसेवा : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील पारधी पिढी परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पैशांची पैज लावून तिरट जुगार खेळणाऱ्या तब्बल २२ जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख ४६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, १५ मोबाईल, एक चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना २५ सप्टेंबर रोजी मांडवा गावातील पारधी पिढी परिसरात लाखो रुपयांचा तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संबंधित परिसर संवेदनशील असल्याने तसेच तेथील परिस्थिती लक्षात घेता कारवाईचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, कोणतीही जोखीम न घेता पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह अंमलदार, जलद प्रतिसाद पथक (आरसीपी) आणि क्यूआरटी पथकाच्या मदतीने परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांचे पथक जुगाराच्या ठिकाणी पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत २२ जणांना तिरट जुगार खेळताना रंगेहात पकडले.

या कारवाईत रोख रक्कम २ लाख ४६ हजार ६०० रुपये, १५ मोबाईल, एक चारचाकी वाहन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे ते आरोपी जाळ्यात

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्यांपैकी संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जुगार अड्ड्यावर झालेल्या या कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.एलसीबीच्या धडाकेबाज कारवाईने अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले


Post a Comment

0 Comments