Type Here to Get Search Results !

येरमाळ्यात २४ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन



तेरणा काठ वृत्तसेवा --- वै. गुरुवर्य ह.भ.प. बंकटस्वामी महाराजांच्या कृपाशिर्वादाने परंपरेने चालत आलेला, वै. गुरुवर्य एकनाथ महाराज पालसिंगणकर, वै. गुरुवर्य ज्ञानोबा महाराज बोधले व वै. भगवानभाऊ येडशीकर यांच्या छत्रछायेखाली आणि वै. आनंदराव भगवानराव पाटील यांच्या प्रेरणेने चालू असलेला  श्रावण महिन्यात होणारा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल मंदिर, येरमाळा येथे २४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत  येथे संपन्न होणार आहे.

अखंड सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ९ ते ११ गाथा भजन,दुपारी ११ ते ५ महिला भजनी मंडळांचे भजन,सायंकाळी ५ ते ६ प्रवचन,तर रात्री ८.३० ते ११ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर होणार आहे.

दररोजच्या कीर्तनानंतर कापूर आरतीही होणार आहे . सोमवारी (ता.२४) प्रवचन ह.भ.प. गिरीश कुलकर्णी येरमाळकर व कीर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पालसिंगणकर यांचे होणार असून मळकापूर,येरमाळा व नागझरवाडी येथे हरिजागर होईल. मंगळवारी (ता.२५) ह.भ.प.विनोद कुलकर्णी (बावीकर) यांचे प्रवचन व ह.भ.प.विष्णू महाराज टेंभुकर , पंढरपूर यांचे कीर्तन होईल. हरिजागर परतापूर,उंबरा व पानगाव येथे होणार आहे.

बुधवारी (ता.२६ ) ह.भ.प. गिरीश कुलकर्णी येरमाळकर यांचे प्रवचन आणि ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (ता.२७) ह.भ.प. दत्तात्रय महाराज बोधले यांचे प्रवचन व ह.भ.प. शिवाजी महाराज मुळे आडसकर यांचे कीर्तन होईल.

शुक्रवारी (ता.२८) सकाळी ८.३० ते १०.३० ह.भ.प. श्रीनिवास महाराज जगताप पालसिंगणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.सकाळी ११ वाजता पालखी येडेश्वरी मंदिराकडे दहीहंडीसह गावप्रदक्षिणा मिरवणूकसाठी प्रस्थान करेल.दुपारी ३ वाजता येडेश्वरी मंदिर पायथ्याच्या पारंपरिक चिंचेच्या झाडावर ह.भ.प.दत्तात्रय बोधले महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार असून,रात्री ९ वाजता येरमाळा आराधी मंडळाचचा आराधी गाणे जागर होणार आहे.

शनिवारी (ता.२९ ) प्रमुख भजनाचा कार्यक्रम,तर रविवारी (ता.३०) दिवसभर पालखीची गावातील मुख्य रस्ते चौकातून नगरप्रदक्षिणा मिरवणूक होऊन कै.आबाजी पाटील यांच्या वाड्यात ह.भ.प.जगन्नाथ महाराज खरात आळंदी यांचा भारुड कार्यक्रम पालखी मिरणूक नंतर आनंदधाम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाप्रसाद भंडारा होणार आहे.

दरम्यान,रविवारी (ता.३० ) रामभाई शाह रक्तपेढी,बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. 

श्री. येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा यात्रा पूर्व धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा पंचक्रोषितील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन येडेश्वरी देवीचे मानकरी पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments