तेरणा काठ वृत्तसेवा --- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा कळंब यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘प्रेरणा पुरस्कार’ कळंब येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये कार्यरत असलेले शिक्षक रमेश हनुमंत चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रेरणा पुरस्कारासाठी यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
रमेश चव्हाण हे सन २०११ पासून नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, कळंब येथे कार्यरत आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण कार्यपद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी विविध उपक्रम राबविले असून, शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत.
शाळेतील विविध अभिनव उपक्रमांमुळे नगर परिषद शाळा क्रमांक २ ला विशेष ओळख प्राप्त झाली असून, आज ही शाळा ‘पीएमश्री शाळा’ म्हणून अभिमानाने ओळखली जाते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लबच्या वतीने त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ‘शिक्षणाची वारी’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गतही महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
केवळ अध्यापनापुरतेच कार्य मर्यादित न ठेवता शाळा, विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक आणि समाज यांच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणारे शिक्षक म्हणून रमेश चव्हाण यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मूळ गाव पानगाव तसेच शिक्षक मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments