नागपंचमीच्या आदल्या दिवशी हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केला जाणारा ‘भावाचा उपवास’ हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि नात्यांच्या अखंडतेचा सुंदर संस्कार आहे.
आपली संस्कृती आपल्याला सण साजरे करायला शिकवतेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नाती जपायला शिकवते. मात्र अलीकडच्या काळात समाजामध्ये एक विचित्र बदल जाणवतोय. कणभर संपत्तीसाठी मनभर प्रेमाची नाती तोडली जात आहेत. क्षणिक स्वार्थासाठी वर्षानुवर्षे जपलेले संबंध दुरावले जात आहेत.
म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी तमाम भगिनींना एकच मनापासून सांगावेसे वाटते—
नात्यांपेक्षा मोठी संपत्ती नाही. गैरसमज, अहंकार, संपत्ती किंवा क्षुल्लक कारणांमुळे नाती तोडू नका. शक्य तितकी नाती जपा, प्रेमाने जपा आणि पुढच्या पिढीलाही ती जपण्याचा संस्कार द्या.
आज सकाळी माझ्या दहा वर्षांच्या मुलीने मला सहज विचारले,
“आई, तू पण भावाचा उपवास धरणार का?”
तिच्या या प्रश्नामागे एक निरागस कुतूहल होतं. कारण तिला माहिती आहे की मला सख्खा भाऊ नाही. पण मी तिला हसत सांगितलं,
“अगं, मी पण भावाचा उपवास धरणार!”
कारण रक्ताची नातीच फक्त नाती नसतात. कधी कधी नात्याने जोडलेली माणसं रक्ताच्या नात्यांपेक्षाही मनाच्या अधिक जवळची असतात. प्रेमाने, विश्वासाने आणि आपुलकीने जपलेले बंधू माझ्याजवळ आहेत.
आणि मग तिला मी एक सुंदर गोष्ट सांगितली—
“माझा नागराजा हाच माझा बंधुराज आहे!”
यामागे केवळ श्रद्धा नाही, तर आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचा एक मोठा इतिहास आणि जीवनाशी जोडलेली भावना आहे.
आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी राजा वर्षभर आपल्या शेतात राबतो. ऊन, वारा, पाऊस, संकटे यांची पर्वा न करता तो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मातीत घाम गाळतो. शेतात काम करताना त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यापैकी सर्पदंशाची भीती हीदेखील पूर्वीच्या काळापासून ग्रामीण जीवनाचा एक भाग राहिली आहे.
म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी शेतकरी कुटुंबातील स्त्री नागराजाला भाऊ मानून त्याच्याकडे आपल्या कुंकवाच्या धनासाठी, आपल्या पतीच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करते.
ही श्रद्धा केवळ नागपूजेपुरती मर्यादित नाही; त्यामध्ये निसर्गाबद्दल कृतज्ञता, प्राणीमात्रांबद्दल सहअस्तित्वाची भावना आणि कुटुंबाच्या सुखासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना दडलेली आहे.
आज विज्ञानाच्या युगात आपण परंपरांकडे पाहताना त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ समजून घेतला पाहिजे. अंधश्रद्धेपेक्षा संस्कार, निसर्गसंवर्धन, जीवसृष्टीबद्दल आदर आणि नात्यांमधील प्रेम ही या सणांची खरी शिकवण आहे.
आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने एक संकल्प करूया—
संपत्तीपेक्षा नात्यांना महत्त्व देऊया.
अहंकारापेक्षा प्रेम मोठं मानूया.
गैरसमजांपेक्षा संवाद निवडूया.
रक्ताच्या नात्यांबरोबरच मनाने जोडलेली नातीही जपूया.
आणि आपल्या पुढच्या पिढीला नात्यांची श्रीमंती वारशाने देऊया.
कारण शेवटी आयुष्याच्या वाटेवर आपल्या सोबत राहते ती संपत्ती नाही, तर माणसं… त्यांच्या आठवणी… आणि त्यांनी दिलेलं प्रेम!
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🐍🌿🙏
नात्यांची श्रीमंती जपा…
कारण नाती टिकली तरच संस्कृती टिकेल,
आणि संस्कार टिकले तरच समाज टिकेल!
सौ उषा अमोल बारकुल (सहशिक्षिका)
विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा...

Post a Comment
0 Comments