घरावरील पत्रे सावरण्याच्या प्रयत्नात दंड कापल्याने रक्तस्त्राव संघर्षातून उभ्या राहिलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
कळंब तालुक्यातील खेर्डा येथील सुपुत्र तथा पुणे येथे कार्यरत असलेले नवपदस्थ विक्रीकर अधिकारी विठ्ठल नागुराव लिके (वय ४७) यांचा घरावरील पत्रे सावरण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे खेर्डा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल लिखे हे पुणे येथे विक्रीकर विभागात कार्यरत होते. नुकतीच त्यांची विक्रीकर निरीक्षक पदावरून विक्रीकर अधिकारी पदावर बढती* झाली होती. वयोवृद्ध आई-वडील आणि शेतीतील पेरणीची कामे लक्षात घेऊन ते दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी, खेर्डा येथे आले होते. दिवसभर शेतातील पेरणीची कामे पूर्ण केल्यानंतर ते रात्री घरी थांबले होते.
रात्री जोरदार पाऊस आणि वादळी वारे मुळे घरात पाणी येत असल्याने रविवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घरावरील पत्रे गळत असल्याने आणि वृद्ध आई - वडील एकटेच राहत असल्याने व त्यांना पुणे येथे कर्तव्यावर जाणे असल्याने काळजीपोटी, नुकसान होण्याची शक्यता असल्याने ते शिडीच्या सहाय्याने घराच्या पत्र्यावर चढत होते. मात्र, चढत असताना त्यांचा तोल जाऊन ते समोरच्या शेड वरील पत्र्यावर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डाव्या हाताला अत्यंत गंभीर दुखापत झाली. हाताचा दंड अक्षरशः फाटून हाडापर्यंत जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कळंब येथे दाखल केले. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी असून या घटनेमुळे खेर्डा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
संघर्षातून गाठले होते यशाचे शिखर
विठ्ठल नागुराव लिके हे चार बहिणींनंतर जन्मलेले आई-वडिलांचे एकुलते एक चिरंजीव होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सरकारी सेवेत उच्च पद प्राप्त केले होते. नुकतीच विक्रीकर अधिकारी म्हणून झालेली त्यांची बढती ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती मानली जात होती.
गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने उच्च पदापर्यंत मजल मारल्याने खेर्डा गावातील प्रत्येकाला त्यांचा सार्थ अभिमान होता. मात्र, एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही अहंकार नव्हता. गावाकडे आल्यानंतर ते प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागत असत. शांत, संयमी, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
*वयोवृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर*
विठ्ठल लिखे यांचे वडील वयोवृद्ध असून, आई गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या एकुलत्या एक मुलाचा झालेला अकाली मृत्यू हा कुटुंबासाठी असह्य आघात ठरला आहे. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, चार बहिणी, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
संघर्ष, कर्तृत्व, साधेपणा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेले विठ्ठलनागुराव लिके यांचे अकाली निधन ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण खेर्डा गावाची मोठी हानी असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.*

Post a Comment
0 Comments