तेरणा काठ वृत्तसेवा --- तहसील कार्यालय कळंब येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती शिल्पा माळवे यांच्या कथित मनमानी, गैरकारभार व शासकीय पदाच्या गैरवापरासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध ठेवण्यात आलेले गंभीर स्वरूपाचे १ ते ४ दोषारोप प्रस्ताव पुढील विभागीय चौकशी व अंतिम कारवाईसाठी मा. विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आले असल्याची अधिकृत माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, धाराशिव यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे.
राजाभाऊ राऊत यांनी अनेक महिन्यांपासून या प्रकरणात सातत्याने निवेदने, तक्रारी व पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली होती. प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कळंब तहसीलदारांमार्फत सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान विविध बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्याने संबंधित दोषारोपांबाबत आवश्यक पुरावे, कागदपत्रे व जोडपत्रे संकलित करून संपूर्ण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वर्ग झाल्यानंतर राजाभाऊ राऊत यांनी मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे स्वतंत्र निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. चौकशी सुरू असताना संबंधित अधिकारी पदावर कायम राहिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची अथवा चौकशी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्रीमती शिल्पा माळवे यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी व दोषी आढळल्यास कठोर शासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून कारवाईस विलंब झाला किंवा दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments