Type Here to Get Search Results !

धाराशिवमध्ये SC आरक्षण उपवर्गीकरणावरून राजकीय वातावरण तापले; परंड्यातून राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर



तेरणा काठ वृत्तसेवा ---धाराशिव जिल्ह्यात अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,आर पी आय (खरात) च्यावतीने राज्य शासनाविरोधात थेट संघर्षाची भूमिका जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसीलदार यांच्यामार्फत रात्रीच्या मुख्य सचिवांना निवेदन देऊन शासनाच्या धोरणावर तीव्र टीका करत निषेध नोंदविण्यात आला.

राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेले उपवर्गीकरण धोरण हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून, राजकीय हेतूने प्रेरित पाऊल असल्याचा आरोप करण्यात आला. अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत, या निर्णयाला “घटनाविरोधी आणि समाजविघातक” ठरविण्यात आले.

यावेळी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार, परांडा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, अनुसूचित जातींना एकसंध गट म्हणून दिलेले घटनात्मक संरक्षण कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणालाच बाधा पोहोचविणारा आहे.

तसेच, शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अहवाल अद्याप सार्वजनिक न केल्यामुळे शासन पारदर्शकतेपासून दूर जात असल्याचा आरोप करत, हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासणारा असल्याचे नमूद करण्यात आले.

राजकीय इशारा आणि संघर्षाची भूमिका

या मुद्द्यावरून आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आर. पी. आय. (खरात)ने स्पष्ट केले आहे की—

शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून निर्णायक लढा उभारला जाईल

 जिल्ह्यातील भाजप आमदार, खासदार व महायुतीच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमांना काळे झेंडे दाखवले जातील

 सर्व शासकीय व राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला जाईल

“हा लढा केवळ आरक्षणाचा नाही, तर सामाजिक न्याय आणि घटनात्मक हक्क वाचवण्याचा आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

मुख्य मागण्या :

SC आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे

न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा

सर्व घटकांची मते विचारात घेऊनच निर्णय घ्यावा

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे धोरण थांबवावे

यावेळी निवेदनावर राजाभाऊ राऊत (जिल्हाध्यक्ष,धाराशिव), दयानंद बनसोडे,(डी.बी. ए.समूहाचे संस्थापक अध्यक्ष) महावीर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष,शिवाजी ढेरे, परंडा तालुकाध्यक्ष,अण्णाराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, अ‍ॅड.दयानंद धेंडे,अर्जुन बनसोडे, कालिदास काशीद, धमरोज नरुटे, भीमराव शिंदे, हनुमंत ढगे, प्रदीप परिहार,आर.ए. रिकोबे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments