तेरणा काठ वृत्तसेवा --- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव विभागामध्ये विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा तसेच धाराशिव आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मानधन तत्त्वावर "मानसेवी वैद्यकीय अधिकारी" (एम.बी.बी.एस.) नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला असून हा निर्णय कर्मचारी हिताचा व स्वागतार्ह असल्याचे मत आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केले आहे.
एस.टी. महामंडळातील चालक, वाहक व इतर कर्मचारी हे दिवस-रात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, तातडीची वैद्यकीय मदत व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मानसेवी वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.
महामंडळाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. २५ मे २०२६ ते ३ जून २०२६ पर्यंत निश्चित केली आहे. सदर मुदत संपल्यानंतर कोणताही प्रशासकीय विलंब न करता पात्र व योग्य उमेदवारांची निवड करून नियुक्ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय (खरात), धाराशिवच्या वतीने करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा असल्याने या विषयात दिरंगाई होऊ नये. प्रशासनाने सकारात्मक व गतिमान भूमिका घेत त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments