Type Here to Get Search Results !

धाराशिवच्या दबंग तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची मध्यरात्री धडक कारवाई ; अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त




तेरणा काठ प्रतिनिधी : आकाश चव्हाण...

धाराशिव : धाराशिव शहर परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी स्वतः मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर जप्त केले. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील काही भागांत रात्रीच्या वेळी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला प्राप्त झाली होती. माहिती मिळताच तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी कोणतीही विलंब न करता स्वतः महसूल विभागाच्या पथकासह रात्री सुमारे सव्वा बाराच्या दरम्यान संबंधित ठिकाणी भेट दिली. त्यानंतर शहर परिसरात विशेष तपासणी आणि नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली.

या तपासणीदरम्यान विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर महसूल विभागाच्या पथकाला आढळून आले. संबंधित वाहन चालकांकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवाने, रॉयल्टी पावत्या तसेच अन्य अधिकृत कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, समाधानकारक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने तिन्ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली.

महसूल विभागाकडून संबंधित वाहन मालकांविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धाराशिव तालुक्यात अवैध वाळू, मुरूम आणि गौण खनिज उत्खननाविरोधात सातत्याने कठोर मोहिमा राबवल्या आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाचा धाक निर्माण झाला असून, मध्यरात्री झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत अवैध उत्खनन रोखण्यासाठी अशाच धडक मोहिमा सातत्याने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments