तेरणा काठ वृत्तसेवा : धाराशिव आणि कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामसेवकांच्या बनावट शिक्के व सह्यांच्या आधारे नोंदण्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
समुद्रवाणी, वलगूड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी, शिंगोली तसेच कळंब तालुक्यातील पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व) व उपळाई या गावांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामसेवकांच्या अधिकृत शिक्के व सह्यांची हुबेहुब नक्कल करून कागदपत्रे तयार करण्यात येत असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर होऊन लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता असून, पात्र कामगारांना हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर, आर.पी.आय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच आतापर्यंत झालेल्या सर्व नोंदण्यांची तपासणी करून बोगस नोंदणी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियंत्रण यंत्रणा उभारावी व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments