तेरणा काठ वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये धाराशिव महसूल विभागाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवून आपला ठसा उमटविला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट निवेदन या प्रकारात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सदर कार्यक्रमासाठी निवेदन व दिग्दर्शनाची जबाबदारी डॉ. जाधव यांच्याकडे होती, तर निवेदनासाठी नायब तहसीलदार श्री. संतोष पाटील यांचीही सहकार्यपूर्ण साथ लाभली.
शेतकरी, दिव्यांग बांधव, निराधार महिला तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या कामांना प्राधान्य देत धाराशिव महसूल विभागाने प्रशासनातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत समाजाभिमुख कार्याची परंपरा जोपासली आहे. विविध घटकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यावर भर देत नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श विभागाने निर्माण केला आहे.
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.
सदर स्पर्धेत वैयक्तिक नृत्य प्रकारात तेजश्री जगदाळे (धाराशिव) यांनी विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच “लखलख चंदेरी” या सामूहिक नृत्य सादरीकरणानेही विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर यशामुळे धाराशिव महसूल विभागाचा गौरव वृद्धिंगत झाला असून, संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment
0 Comments