Type Here to Get Search Results !

घुगरी महाप्रसादाने देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान



तेरणा काठ वृत्तसेवा ---देवीच्या पालखीची आमराई मंदिरामध्ये विधीवत महापूजा तसेच महाआरती करण्यात आली. यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने आज मंगळवारी श्री . येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सावाची सांगता झाली.

 गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदीरात पालखी मुक्कामी होती.पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते यानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.

सलग पाच दिवस चालू असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चुनाववेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर पंधरा लाखांहून अधिक संख्येने उपस्थित राहून भाविकांनी पालखी वर चुनखडी टाकली तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पालखीचा मुक्काम पाच दिवस असतो.या काळात भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होती. आज दि .7 रोजी यात्रेचा शेवट दिवस असल्याने भाविकांनी पालखी दर्शनासह घुगरी प्रसादासाठी मोठी गर्दी केली होती.शिवाय मनोरंजनासाठी आलेल्या व्यवसियाकांच्या स्टॉलमधील आवश्यक वस्तुं,गृहउपयोगी सामानाची खरेदी करण्यात महिला भाविक गुंतल्याचे चित्र दिसत होते.यात्रा म्हणलं की,अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते यामध्ये  रवीवारी रात्री पांचक्रोशीतील देवीच्या आराधी मंडळासाठी आराधी गाण्यांच्या स्पर्धा व सोमवारी रात्री शोभेच्या दारुची आतिषबाजी करून भाविकांचे व यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे मनोरंजन करण्यात आले.आज शेवटच्या दिवशी गावातील घरोघरी जाऊनरब्बी हंगामातील नवीन ज्वारी,गहू,हरभरा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करुन घुगरीचे वाटप केले जाते. 4 वा.आमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करुन घुगरी महाप्रसादाचे पुजारी,मानकरी,ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घूगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.या घुगरी प्रसादासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक आले होते.

आज पालखीचे प्रस्थान मुख्य डोंगरावरील मंदिराकडे होत असताना गावातील मुख्य चौका चौकातून जाते. पालखीच्या पाठवणीसाठी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा शिंपून रांगोळी काढली होत्या फुलं अंथरुन,पालखीला पायघड्या घालण्यात आल्या होत्या पालखीघरासमोर आल्यानंतर पालखीच्या खांदेकरी,यांच्या पायावर पाणी वाहून चुरमुरे,लाह्या,बतासे,रेवढ्याचा प्रसाद वाहून प्रसाद वाटला. गेले पाच दिवस यात्रेच्या उत्साहाचे होते. पालखीची पाठवणी म्हणजे नववधूच्या लग्नानंतरची पाठवणी असे कांही वातावरण पालखी पाठवणीचे असते. पालखी जाताना चित्र पाहुन कांही महिला भाविकांचे डोळे पाणावलेले दिसले त्यामुळे साश्रुनयनांनी देवीच्या पालखीस भाविकांनी जडअंतःकरणाने निरोप दिला गावातून पालखी गावकुसाबाहेरील ढाशीवर आल्या नंतर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेत सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे आभार म्हणून शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.याशिवाय टँकर,पाणपोई,पाणी बाटली वाटप करणाऱ्या भक्तांचेही सन्मान करण्यात आले.यानंतर देवीची पालखी डोंगरवरील मुख्य मंदिराकडे रवाना झाली 


.....देवीची पालखी आलेल्या दिवशी लाखो भाविकांनी वेचलेली चूनखडी शुक्रवारी रात्री चुन्याच्या रानातील राशीवर गोवऱ्याच्या भट्टीत भाजन्यात आली.याभाजलेल्या चुन्याच्या राशीतील चुना वेचून पंचक्रोशीत भाविक चूनाच्या राशीवर जमा करतात.आज पालखी सोबत ही भाजलेली चुनखडीची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करुन बैलगाडीने मंदिराकडे नेहून रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी मंदिराला पहाटे चुन्याने रंगावण्याची प्रथा आहे. पहाटेच भाविक मंदिरात चुन्याने मंदिर सारववात.ही प्रथापूर्वापार चालत आली असून यासाठी आज आलेले भाविक मुकामी मंदिरावर राहतात तर कांहीं भाविक पहाटे मंदिराला सारवण्यासाठी येतात.त्यामुळेच चुना वेचण्याची परंपरा रूढ झाली आहे. चुना नेण्यासाठी जी बैलगाडीचा मान सखाराम मोरे , गणेश मोरे , बाबुशा मोरे कुटुंबीयाकडे आहे .हे कुटुंबीय मोठ्या भक्तीभावाने ही प्रथा आजही जपतात .

..... घुगरी महाप्रसादासाठी लागणारे धान्य गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन ज्वारी ,गहु , हरभरा गोळा केला जातो आणि हे धान्य गोळा करण्याचा मान येथील दत्तात्रय उंबरदंड यांच्याकडे आहे आणि आजही उंबरदंड कुटुंबीय हे कार्य आत्मीयतेने करतात .

Post a Comment

0 Comments