तेरणा काठ वृत्तसेवा -- कळंब पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम पार पडला असून, समसमान संख्याबळामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ. राजश्रीताई वरपे यांची सभापतीपदी तर भाजपाच्या सौ. प्रणिताताई चव्हाण यांची उपसभापतीपदी निवड झाली.
कळंब तालुक्यांत आठ सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निवडून आले होते. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे पाच आणि भाजपाचे तीन सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ निर्माण झाले. सभापती पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सौ. सीमाताई टेकाळे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सौ. राजश्रीताई वरपे यांच्या नावाच्या चिठ्या टाकण्यात आल्या. नशिबाच्या या खेळात चिठ्ठी राजश्रीताई वरपे यांच्या नावाची निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापती पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मनोज घोगरे व भाजपाकडून सौ. प्रणिताताई चव्हाण यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये चिठ्ठी प्रणिताताई चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. नूतन सभापती राजश्रीताई वरपे व उपसभापती प्रणिताताई चव्हाण यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

Post a Comment
0 Comments