Type Here to Get Search Results !

.निवडणुका रखडलेल्या ग्रामपंचायतींसाठी सरपंचाची प्रशासक नेमणुकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांचे आदेश.



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली असून काही ग्रामपंचायतींची मुदत येत्या २८ फेब्रुवारी २०२६ ला किंवा त्यापूर्वी संपुष्टात येत आहे.मात्र प्रशासकीय कारणांमुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज ठप्प होऊ नये, तसेच प्रशासनात कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ प्रशासक (प्रशासकीय सरपंच) नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १५१ (३) तसेच उपकलम (१) मधील तरतुदीनुसार पंचायत निवडणूक घेणे शक्य नसल्यास शासनास प्रशासक नेमण्याचा अधिकार आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या २० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार व त्यासंदर्भातील शासन निर्णयांच्या आधारे जिल्हा परिषद धाराशिव यांना हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार ज्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपली आहे किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही, त्या ठिकाणी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अथवा नवीन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासक व प्रशासकीय समिती यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व त्याअंतर्गत नियमांनुसार प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार वापरण्याची तसेच कर्तव्ये पार पाडण्याची मुभा देण्यात आली आहे. विकासकामे, आर्थिक व्यवहार, प्रशासकीय निर्णय तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नयेत, याची जबाबदारी संबंधित प्रशासकांवर राहणार आहे.

या संदर्भातील आदेश जिल्हा परिषद धाराशिव सामान्य प्रशासन (ग्रामपंचायत) विभागामार्फत निर्गमित करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका प्रशासन व संबंधित विभागांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेश लागू होताच संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पुढील निवडणुका होईपर्यंत ग्रामपंचायत कारभार प्रशासकीय नियंत्रणाखाली राहणार आहे.

Post a Comment

0 Comments