तेरणा काठ वृत्तसेवा --- महसूल प्रशासनात कार्यक्षमतेचा ठसा उमटवत मा. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचा कामाचा धडाका कायम असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न कायदेशीर प्रक्रियेद्वारे मार्गी लावण्यात आला आहे.
आंबेजवळगा (गुंजेवाडी) येथील अर्जदार संदीप बाजीराव धंगेकर यांच्या अर्जावर सुनावणी घेत, मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ मधील कलम ५ (२) अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला. त्यानुसार गट क्रमांक ४३३ व ४२८ मध्ये जाण्यासाठी गट क्रमांक ४३८, ४३७, ४३४, ४३३ व ४२६ यांच्या मधील बांधावरून शेतरस्ता अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला.
सदर कार्यवाहीदरम्यान संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधत, परस्पर सहमतीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद निकाली काढण्यात आला. सुमारे २४०० फूट लांबी व १२ फूट रुंदी असलेल्या या रस्त्यामुळे परिसरातील ७० ते ८० शेतकऱ्यांना थेट लाभ झाला आहे.
या निर्णयामुळे शेतीमालाच्या वाहतुकीस गती मिळणार असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात सुलभता निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनाने कायदेशीर चौकटीत राहून प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
या कारवाईत मंडळ अधिकारी गुळमिरे डी. ए. तसेच ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून रस्त्याच्या हद्दी निश्चित करत अंमलबजावणी पूर्ण केली.


Post a Comment
0 Comments