Type Here to Get Search Results !

दहिफळ गावातील महिला दारूबंदीसाठी ठाम आता प्रतिक्षा शासन निर्णयाची



  तेरणा काठ वृत्तसेवा --- दहिफळ येथील महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी महिलांनी संघर्षमय लढा गेल्या दोन महिन्यांपासून उभारला आहे यासंदर्भात प्रशासनाकडे केलेल्या मागणी अर्जावरील सह्यांचे सोमवारी 'व्हेरिफिकेशन' करण्यात आले.

गावच्या तरुण पिढीचं भविष्य 'दारूमुक्त' असावं, ही मागणी घेऊन तालुक्यातील दहिफळ येथील मायमाऊलींनी दारूबंदीसाठी दोन महिन्यांपासून लढा उभा केला आहे. यातून दारूबंदीची मागणी करणारी महिला' स्थानिकच आहे का, याची सत्यता तपासली जात आहे.अर्जावरील सह्यांचे सोमवारी 'व्हेरिफिकेशन' करण्यात आले

दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी महिलांनी संघर्षमय लढा उभारला आहे. यासाठी गावात बैठकांचे सत्र झाले. ग्रामपंचायत कार्यालयात संतप्त महिलांनी ठिय्या मारला. याशिवाय गावात जनजागृती रॅली, विशेष ग्रामसभापण झाली. थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तेथे दहिफळ येथील महिलांच्या दारूबंदीचा आवाज उठवला 

मात्र, एखाद्या गावाच्या कार्यक्षेत्रात दारूबंदी करायची असेल तर यासाठी विहीत कायदेशीर प्रक्रिया आहे. यासाठी शासन अधिसूचना १२ फेब्रुवारी २००९ यानुसार प्रक्रिया राबवली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे नियम, दारूबंदी कायदा, निर्देश पाळावे लागतात. यानुसार दहिफळ दारूबंदी लढ्यात सहभागी झालेल्या महिलांनी आपला रीतसर अर्ज ग्रामपंचायत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर दारूबंदीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. प्रशासनाला मिळालेल्या मागणी अर्जावर सह्या करणाऱ्या महिला या दहिफळकरच आहेत का? त्यांचीच स्वाक्षरी आहे का? याची पडताळणी सोमवारी करण्यात आली.

आधार, मतदार यादीत नाव पाहून गावच्या रहिवासाची खातरजमा करण्यात आली तर पुनर्वाक्षरी करून घेत सह्यांची खात्री केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी दारूबंदी विभागाचा मोठा फौजफाटा वर्दीत तैनात होता. यात निरीक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय पंचायत समिती विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, येरमाळा पोलिसही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments