तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्राजवळ घडलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी सतीश मुंडे (वय ३७) हे मित्रांसह कळंब तालुक्यातील चोराखळी शिवारातील महाकाली कला केंद्र येथे तमाशा कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर परत जात असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर कथितपणे हल्ला केल्याची तक्रार मयताचे वडील भागवत मुंडे दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी लाथाबुक्क्यांनी पोट व छातीवर मारहाण केल्याने सतीश मुंडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे व दत्ता तोंडे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रांच्या परवान्यांबाबतचा प्रशासकीय मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका या पाच कलाकेंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही आदेशांवर विभागीय आयुक्त स्तरावर स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या महाकाली कला केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात असून संबंधित केंद्राचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कलाकेंद्रांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .

Post a Comment
0 Comments