तेरणा काठ वृत्तसेवा --- महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुरूम शहरात आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणारे ध्यानधारणा शिबिर उत्साहात संपन्न झाले. रोटरी क्लब मुरूम सिटी व ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १४) रोजी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालय राजूभाई भालकाटे होते. याप्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे संतोष कांबळे, कल्लया स्वामी, राजेंद्र वाकडे, मल्लिकार्जुन बदोले, डॉ. नितीन डागा, कमलाकर मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भालकाटे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत ध्यानधारणा ही केवळ एक साधना नसून काळाची गरज बनली आहे. मानसिक शांतता, सकारात्मक विचारसरणी आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे. त्यांनी विविध प्रकारच्या ध्यानपद्धतींचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरामुळे सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments