Type Here to Get Search Results !

हुरडा पार्ट्यांच्या गर्दीत ग्रामीण भागात अजूनही जपली जाते माणुसकीची परंपरा...



तेरणा काठ वृत्तसेवा --- शहरी भागात हुरडा पार्ट्यांचे व्यवसायिकीकरण झालेले असताना ग्रामीण भागात पारंपारिक हुरडा पार्ट्यांवर शेतकरी बांधव देखील भर देताना दिसत आहे. महाराष्ट्रासह सीमावरती ग्रामीण भागात हिवाळ्यात रंगणाऱ्या हुरडा पार्ट्यांचा उत्साह यंदाही ओसंडून वाहताना आहे. उमरगा तालुक्यातील बिराजदार वस्तीतील कलाप्पा पाटील यांनी आपल्या मित्र परिवाराला एकत्रित आणून शेतात हुरडा पार्टी गुरुवारी (ता. १९) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केली. शहरातील लोकांना शेतीची ओळख व्हावी, ग्रामीण परंपरा जपल्या जाव्यात, नवीन पिढीला शेती संस्कृतीची ओळख व्हावी, याकरिता या अनोख्या पार्टीचे आयोजन केले जाते. यामुळे सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते. रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, संतोष कांबळे, उपप्राचार्य कलय्या स्वामी, मल्लिकार्जुन बदोले, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार वाकडे, प्रा. भूषण पाताळे, शरणाप्पा धुम्मा, सहशिक्षक नागनाथ बदोले आदींनी याचा आस्वाद घेतला. हुरडा म्हणजे ज्वारीच्या कोवळ्या कणसांना शेतातल्या चुलीवर भाजून थेट ताटात  तयार केलेला पारंपरिक खाद्यपदार्थ. शेतातच कणसे भाजून त्यासोबत लसूण चटणी, शेंगदाण्याची चटणी, गूळ, चिवडा, खारमुरे, पेंडखजूर, उसाचा रस यांचा आस्वाद घेण्याची खास मेजवानी यावेळी ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून हुरडा तयार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी विठ्ठल कुडवकल, सुनील कुडवकल यांनी हुरडा परंपरेचे महत्त्व सांगितले. हुरडा पार्टी ही केवळ खाद्य मेजवानी नसून शेतकरी संस्कृतीचा एक उत्सव आहे. निसर्गाशी नाते जपण्याचा हा एक सुंदर मार्ग असून हा गावरान मेवा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी साऊंड सिस्टिम लावून वातावरण निर्मिती करून लोकगीतांचे सादरीकरण, पारंपरिक खेळांचे आयोजन, मनोरंजनात्मक विषयांवर चर्चा घडवून आल्या. हुरडा पार्टीच्या उत्साहात रसवंती चालक महादेव मुळे, नरसप्पा पाटील, मल्लिनाथ पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन आपुलकीने खाऊ घालण्यावर भर दिला. यामुळे आलेल्या सर्वांनाच आपल्या भारतीय परंपरेचे दर्शन दिसून आले. 


Post a Comment

0 Comments