Type Here to Get Search Results !

जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला अनं स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं



तेरणा काठ वृत्तसेवा --- सुमारे चारशे वर्षांपूर्वी ज्या मातेच्या उदरातून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन.

जिजाऊंनी केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असे संस्कार केले की त्यातून रयतेच्या हक्कांचं, समता-बंधुता-न्याय या मूल्यांवर आधारलेलं स्वराज्य उभं राहिलं. अठरा पगड जातींना समान न्याय देणारं, स्त्रीसन्मानाला अग्रक्रम देणारं, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख असं राज्य उभारण्याची प्रेरणा जिजाऊंच्या विचारांतूनच मिळाली.

रयतेच्या संरक्षणाइतकीच महत्त्वाची बाब म्हणजे स्त्री सन्मान — ही शिकवण स्वराज्याची भक्कम पायाभरणी होती. मात्र आजच्या समाजात आपण पाहतो की स्त्रियांच्या नावाने प्रतिनिधित्व दिलं जातं, त्यांना निवडणुकीत उभं केलं जातं; पण अनेक ठिकाणी निर्णयक्षमता मात्र त्यांच्या हाती नसते. ज्या जिजाऊंनी अख्खं स्वराज्य घडवलं, त्याच स्वराज्यात आज काही ठिकाणी स्त्रियांना केवळ पदापुरतं पुढे केलं जातं आणि निर्णय मात्र इतरांकडून घेतले जातात — ही खंत व्यक्त करावीशी वाटते.

खऱ्या अर्थाने जिजाऊंचा वारसा जपायचा असेल, तर स्त्रियांना केवळ प्रतिनिधी न बनवता निर्णयक्षम, सक्षम आणि स्वायत्त नेतृत्व देणं गरजेचं आहे. तेव्हाच समता, न्याय आणि सन्मान यांवर आधारित स्वराज्याची खरी परंपरा पुढे जाईल. 

सौ उषा अमोल बारकुल (विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा)

Post a Comment

0 Comments