Type Here to Get Search Results !

महिलांसाठी सलग तिसऱ्या वर्षी जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन; सोन्याच्या नथा, आकर्षक पैठण्या, भेटवस्तूंची लयलूट



तेरणा काठ वृत्तसेवा --- महिलांसाठी सलग तिसऱ्या वर्षी जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन; सोन्याच्या नथा, आकर्षक पैठण्या, भेटवस्तूंची लयलूट होणार असून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या आनंदात भर पडावी आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने येरमाळा येथे ‘जागर स्त्रीशक्तीचा नवरात्र महोत्सव २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर आणि रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी दोन दिवस हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.

येरमाळा गावातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात सोन्याच्या नथा चांदीच्या वस्तू व आकर्षक पैठण्या आणि विविध भेटवस्तूंची लयलूट असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना मनोरंजनाची संधी मिळण्याबरोबरच नवरात्रोत्सवाचा आनंद एकत्रितपणे साजरा करता येणार आहे. गावातील महिलांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.

जागर स्त्रीशक्तीचा’ या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे २५ आकर्षक पैठण्या आणि ५० विविध भेटवस्तू होय. याशिवाय विशाल ज्वेलर्स येरमाळा यांच्याकडून सोन्याची नथ व अकरा पैठण्या, अनुष्का ज्वेलर्स येरमाळा यांच्याकडून सोन्याची नथ, सोमनाथअप्पा सराफ यांच्याकडून सोन्याची नथ, तर राजलक्ष्मी ज्वेलर्स येरमाळा यांच्याकडून चांदीच्या दोन वस्तू देण्यात येणार आहेत. या बक्षिसांमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार असून, महिलांना विविध आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सामाजिक बांधिलकीतून दात्यांचे सहकार्य......

या महोत्सवाच्या आयोजनासाठी येरमाळ्यातील विविध मान्यवर, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत आर्थिक सहकार्य केले आहे. यामध्ये डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांनी १५ हजार रुपये,  विकास बलभीम देशमुख यांनी ११ हजार रुपये,  संतोष बाबासाहेब तौर यांनी ९ हजार रुपये, तर  बालाजी शंकरराव बारकुल  यांनी ७ हजार रुपये तसेच धनंजय तुकाराम बारकुल यांनी ५ हजार रुपये, अमोल रामकृष्ण बारकुल यांनी ५ हजार रुपये, तर अमोल बापूसाहेब पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे. या मान्यवरांच्या सहकार्यामुळे येरमाळा येथील महिलांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आनंदासाठी आणि उत्साहासाठी पुढाकार घेणाऱ्या दात्यांच्या सहकार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

महिलांच्या उत्साहाला मिळणार नवी ऊर्जा

नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. याच भावनेतून ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा उपक्रम महिलांना आनंद, उत्साह आणि एकत्रित सहभागाचेव्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरत आहे. सलग तिसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने येरमाळ्यातील महिलांमध्ये या महोत्सवाबाबत उत्सुकता निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप मिळावे आणि महिलांसाठी आणखी आकर्षक कार्यक्रम आयोजित करता यावेत, यासाठी अमोल सर बारकुल व बालाजी बारकुल आयोजकांकडून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. महिलांच्या आनंदासाठी, स्त्रीशक्तीच्या सन्मानासाठी आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘जागर स्त्रीशक्तीचा नवरात्र महोत्सव २०२६’ येरमाळ्यातील महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments