तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्रायातील रामवाडी येथील समाज मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या शासकीय गावठाण जमिनीवर बेकायदेशीरपणे ठिय्या मांडणाऱ्या भूमाफियांविरोधात समस्त बौद्ध समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. ग्रामपंचायतीचा स्पष्ट ठराव असतानाही संबंधित शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ही जागा बौद्ध विहारासाठी हस्तांतरित करण्यात यावी, अशी जळजळीत मागणी समस्त बौद्ध बांधवांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रामवाडी ग्रामपंचायतीने बौद्ध विहारासाठी जागेचा अधिकृत ठराव मंजूर केलेला असतानाही बापू चंदनशिवे, देवानंद चंदनशिवे व अनंत चंदनशिवे यांनी संगनमताने दगड, माती आणि कुंपण घालून सदर शासकीय जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण गैरप्रकारात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या पदगैरवापराची सखोल चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कडक विभागीय कारवाई करण्यात यावी.
जातीवाचक धमक्या देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: अतिक्रमणाला सनदशीर मार्गाने विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करणे, जातीवाचक हीन शब्द वापरणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या असामाजिक तत्त्वांची पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि त्यांच्यावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी.
संयुक्त मोजणी करून अतिक्रमण तत्काळ हटवा: तहसीलदार, मंडळ अधिकारी व भूमापक यांच्या माध्यमातून या जागेची संयुक्त मोजणी करण्यात यावी. गावठाण नकाशा, गाव नमुना ८, फेरफार नोंदी आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाची शहानिशा करून तात्काळ अतिक्रमण जमीनदोस्त करावे व बौद्ध विहाराचा मार्ग मोकळा करावा.
...अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!
प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास, बौद्ध बांधव व ग्रामस्थ शांत बसणार नाहीत. लोकशाही आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराच निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे,आरपीआय (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजा राऊत, सुनील वाघमारे,बाळू भोसले, राजेंद्र कोथिंबिरे, शहाजी म्हस्के, पंकज भोसले, विकास कांबळे, धनंजय कांबळे, सुरेश भोसले, मधुकर कोथिंबिरे, धोंडीराम कोथिंबिरे, दत्ता कांबळे, बुबा वाघमार, ग्रा.पं.सदस्य सागर कसबे , उत्तम म्हस्के, क्रांती भोसले, शंकर शिरसट, हरिचंद्र सोनवणे, सुनील भालेराव, वाघासाहेब भोसले आणि अविनाश गंगावणे यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments