Type Here to Get Search Results !

दीड महिन्यापासून पाऊस गायब; सोयाबीनचे पीक पूर्णपणे उध्वस्त



तेरणा काठ वृत्तसेवा --- रुईभर, खामसवाडी, अनसूर्डा आणि बरमगाव बुद्रुक परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पीक अक्षरशः उध्वस्त झाले आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, ऐन पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पाऊस गायब झाल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची परिस्थिती पाहता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याचे चित्र आहे.

रुईभर येथील आकाश चव्हाण यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे संपूर्ण पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात; तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करा

पावसाअभावी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उत्पादन राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सोयाबीन नुकसानग्रस्त क्षेत्र जाहीर करावे, पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, रुईभरसह खामसवाडी, अनसूर्डा, बरमगाव बुद्रुक परिसरातील शेतकरी संकटात; तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करण्याची आकाश चव्हाण यांनी मागणी केली आहे.

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पीक उध्वस्त होत आहे. आता आश्वासनांची नाही, तर तातडीच्या मदतीची गरज आहे,” अशी भावना यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments