Type Here to Get Search Results !

समाज मंदिराच्या जागेवर आर.ओ. प्लॅटचा ठराव; आंबेडकरी समाजाचा तीव्र विरोध



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव शहरातील तांबरी विभाग, लिंबोणी बाग परिसरातील सर्व्हे क्रमांक १४ मधील जागेवर आर.ओ. प्लॅट उभारण्यासंदर्भात धाराशिव नगर परिषदेने घेतलेल्या ठराव क्रमांक ५६० वरून आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या जागेवर मागील सुमारे ३५ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रम सुरू असून, सन २००८ पासून याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय समाज मंदिर उभारण्याची मागणी प्रलंबित असल्याचा दावा माता भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.

सन २०१३ मध्ये याच जागेवर समाज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर निविदा प्रक्रिया देखील झाल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, भूमिपूजन आणि निविदा प्रक्रियेनंतरही समाज मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण झाले नसल्याने मंजूर निधीची सद्यस्थिती काय आहे, निधीचा विनियोग कसा झाला, निविदा प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर थांबली आणि तब्बल इतकी वर्षे काम रखडण्यामागे नेमके कारण काय? याची सखोल प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठराव ५६० वरून आंबेडकरी समाज आक्रमक

दिनांक १६ मार्च २०२६ रोजी झालेल्या धाराशिव नगर परिषदेच्या आमसभेत ठराव क्रमांक ५६० अंतर्गत सर्व्हे क्रमांक १४ मधील जागेवर आर.ओ. प्लॅट उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. समाज मंदिरासाठी दीर्घकाळापासून मागणी असलेल्या जागेचा वापर आर.ओ. प्लॅटसाठी करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

मात्र, आंबेडकरी समाजाने आर.ओ. प्लॅटला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. “शहराला आर.ओ. प्लॅटची गरज आहे; परंतु समाज मंदिरासाठी मागणी असलेल्या जागेवरच आर.ओ. प्लॅट उभारण्यास आमचा ठाम विरोध आहे. नगर परिषदेने आर.ओ. प्लॅटसाठी स्वतंत्र पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,” अशी भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.

२०१३ पासून रखडलेल्या समाज मंदिराची चौकशी करा

समाज मंदिराचे भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष बांधकाम का झाले नाही, मंजूर निधीची सद्यस्थिती काय आहे, निविदा प्रक्रिया कुठे थांबली आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी काय होती, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करून आवश्यक असल्यास लेखापरीक्षण करण्यात यावे आणि समाज मंदिरासाठी मंजूर निधीचा संपूर्ण हिशोब जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विविध स्तरांवर निवेदने; कार्यवाहीची मागणी

या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच नगर परिषद प्रशासनाकडे निवेदने सादर करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. सामाजिक न्यायमंत्र्यांनी निवेदनावर तातडीने योग्य कार्यवाही करण्याचा शेरा दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठराव ५६० रद्द करा; पर्यायी जागेवर आर.ओ. प्लॅट उभारा

आंबेडकरी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये नगर परिषदेचा ठराव क्रमांक ५६० रद्द अथवा स्थगित करणे, आर.ओ. प्लॅटसाठी स्वतंत्र पर्यायी जागा निश्चित करणे, समाज मंदिरासाठी सुधारित अंदाजपत्रक व आवश्यक निधी मंजूर करणे, सन २०१३ पासून रखडलेल्या प्रक्रियेची चौकशी करणे आणि समाज मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू करणे यांचा समावेश आहे.

१५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा जनआंदोलन

प्रशासनाने या प्रश्नावर १५ दिवसांच्या आत ठोस व लेखी निर्णय घ्यावा, अन्यथा आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा, धरणे आंदोलन, जनआंदोलन आणि आवश्यकता भासल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

“समाज मंदिरासाठी मागणी असलेल्या जागेचा वापर अन्य कारणासाठी करू देणार नाही. आर.ओ. प्लॅट उभारायचा असेल तर नगर परिषदेने पर्यायी जागा द्यावी. समाज मंदिराच्या जागेचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

या निवेदनावर आरपीआय (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजा राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे, आरपीआय (आठवले)चे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, विजयमाला धावारे, रंजित गायकवाड, सिद्धार्थ ओव्हाळ, आप्पासाहेब धावारे, अंगुलमाने, अश्रूबा शितोळे, संग्राम बनसोडे, संपत ज्ञानराव, प्रसादकुमार बनसोडे, संतोष बनसोडे, राजेंद्र धावारे यांच्यासहअनेक आंबेडकरी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments