तेरणा काठ वृत्तसेवा : पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांवर झालेला परिणाम तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी संयुक्त पीक पाहणी समितीने धाराशिव तालुक्यातील सर्व ११ महसूल मंडळांमध्ये प्रत्यक्ष शेतशिवारात उतरून पाहणी केली. हिंगळजवाडी येथील एका पाहणीस्थळी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनीही भेट देत पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या अडचणींची माहिती घेतली.पाहणीदरम्यान तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड, उत्पादनावर होणारा परिणाम आणि स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातील पिकांची परिस्थिती समितीसमोर मांडली. यावेळी पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला.
आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ, KVK शास्त्रज्ञांकडून तांत्रिक पाहणी
या पाहणीमध्ये IIT मुंबई येथील तज्ज्ञ तसेच कृषी विज्ञान केंद्रातील (KVK) शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची वाढ, पावसाच्या ताणामुळे झालेला परिणाम, पिकांची अवस्था तसेच किडी-रोगांच्या संभाव्य स्थितीबाबत माहिती घेतली.शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची सद्यस्थिती तज्ज्ञ व कृषी शास्त्रज्ञांसमोर मांडली. त्यानंतर तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी करून पिकांच्या अवस्थेचे तांत्रिक निरीक्षण केले. त्यामुळे प्रशासकीय पाहणीसोबतच तांत्रिक दृष्टिकोनातूनही पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
११ महसूल मंडळांत प्रत्यक्ष पाहणी
संयुक्त समितीने धाराशिव तालुक्यातील केशगाव, धाराशिव ग्रामीण, धाराशिव शहर, आंबेजवळगा, येरशी, तेर, ढोकी, पाडोळी, जागजी, बेंबळी आणि करजखेडा या ११ महसूल मंडळांमध्ये विविध गावांतील शेतशिवारांची पाहणी केली.यामध्ये कवळदरा, वडगाव सि., धाराशिव, खानापूर, उपळा मा., हिंगळजवाडी, ढोकी, तेर, काजळापाटी, सरोला बु., बाळपीरवाडी, दरफळ, चिखली, महालिंगी, आंबेवाडी, धारूर आणि तोरंबा आदी ठिकाणांचा समावेश होता. काजळा येथे सध्या पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या समितीसमोर मांडली. यावेळी सोयाबीन व ऊस पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य नुकसानीचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तसेच विहीर अधिग्रहणाची पाहणी करून त्याची पडताळणी करण्यात आली. गावातील टंचाईच्या परिस्थितीचा पुढील नियोजनात समावेश करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती घेण्यात आली.
टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना टंचाई कृती आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा निष्काळजीपणा होऊ नये, असे निर्देश देण्यात आले असून, कामात हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले.प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल,” असे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी गावातील पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी समितीसमोर मांडल्या.यावेळी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी, IIT मुंबईचे तज्ज्ञ, KVKचे शास्त्रज्ञ तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
संयुक्त समितीकडून करण्यात आलेल्या या पाहणीच्या आधारे पीक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल आणि टंचाई उपाययोजनांसाठीचा कृती आराखडा वरिष्ठ प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

Post a Comment
0 Comments