Type Here to Get Search Results !

श्री नृसिंह गणेश मंडळाच्या डान्स स्पर्धेमुळे लहान कलाकारांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ



तेरणा काठ वृत्तसेवा -- येरमाळा येथील बाजार चौकातील श्री नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लहान मुलांच्या भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला परिसरातील बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

येरमाळा परिसरातील सांस्कृतिक वारसा जपणारे आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन तसेच सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे मंडळ म्हणून श्री नृसिंह गणेश मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच उद्देशातून लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि कला-संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या हेतूने डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण सुनील शिंदे सर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक आरुषी बारकुल, द्वितीय क्रमांक मुस्कान पठाण, तर तृतीय क्रमांक श्रेया तोडकरी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके कु. प्रांजल अमोल बारकुल व शर्वरी तोडकरी यांना देण्यात आली.

विजेत्या विद्यार्थ्यांना येरमाळा पंचायत समिती सदस्य श्री राहुल पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना सरपंच सौ. सुप्रिया विशाल बारकुल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

‘बाल धमाल’लाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्री नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘बाल धमाल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

२१ सप्टेंबरला केंद्रीय प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन

मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहणार असून दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा, येरमाळा येथील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणे आणि शिक्षणासोबतच संस्कार व सामाजिक जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

श्री नृसिंह गणेश मंडळाच्या या विविध उपक्रमांमुळे येरमाळा परिसरात ‘सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि संस्कार जपणारे मंडळ’ अशी मंडळाची ओळख अधिक दृढ होत आहे.


या सर्व उपक्रमांना प्रसिद्धीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या येरमाळा पत्रकार संघाचे मंडळाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments