तेरणा काठ वृत्तसेवा --- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तब्बल दहा महिने अनवाणी पायाने चालत शासनाचे लक्ष वेधून घेणारे शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांचा शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर दहिफळ ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एक-एक रुपया जमा करून हा सत्कार आयोजित केला. संघर्ष, त्याग आणि शेतकरी हितासाठी केलेल्या निस्वार्थ लढ्याचा गौरव म्हणून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा संजय पाटील दुधगावकर यांनी केली होती. या निर्धाराला ते शेवटपर्यंत खंबीरपणे चिकटून राहिले. उन्हाळा, पावसाळा आणि विविध अडचणींचा सामना करत त्यांनी तब्बल दहा महिने अनवाणी पायाने प्रवास केला. या काळात त्यांनी राज्यातील विविध भागांत जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आणि कर्जमाफीची मागणी लावून धरली.
शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून दहिफळ ग्रामस्थांनी त्यांच्या संघर्षाचा गौरव करण्यासाठी नागरी सत्काराचे आयोजन केले. विशेष म्हणजे हा सत्कार कोणत्याही एका व्यक्तीच्या मदतीने नव्हे, तर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एक-एक रुपया जमा करून केला. त्यामुळे हा सत्कार सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करणारा ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा पाटील यांनी त्यांच्या पायात बुट घालून दहा महिन्यांच्या प्रतिज्ञेची सांगता केली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या संघर्षाला मानवंदना दिली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात संजय पाटील दुधगावकर यांच्या चिकाटीचे आणि शेतकरी हितासाठी केलेल्या त्यागाचे कौतुक केले. वैयक्तिक सुखसोयींचा विचार न करता त्यांनी केलेला संघर्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. त्यांच्या निर्धारामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, हा लढा शेतकरी चळवळीच्या इतिहासात स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी सरपंच दत्तात्रय बोरके, अशोक भातलवंडे, नारायण भातलवंडे, बालाजी भातलवंडे, कृष्णा पाटील, आश्रुबा भातलवंडे, वसंत भातलवंडे, वसंत धोंगडे, भाऊ सुतार, श्रीकांत धोंगडे, महादेव कांबळे, अवदुंबर धोंगडे, रंजीत वरपे, प्रशांत भातलवंडे, वैजिनाथ मते, सुरेश मते, पोपट पाटील, बालाजी मते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय गौर, वाघोली, बाभळगाव, तुगाव, शेलगाव, बारातेवाडी, मोहा, खामसवाडी, मस्सा आणि दहिफळ परिसरातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी संजय पाटील दुधगावकर यांना पुढील सामाजिक व शेतकरी हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्जमाफीच्या मागणीसाठी केलेल्या त्यांच्या त्याग, जिद्द आणि संघर्षाची परिसरात सर्वत्र चर्चा होत असून, दहिफळ येथे झालेला हा नागरी सत्कार शेतकरी चळवळीतील संघर्षशील प्रवासाचा सन्मान म्हणून कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments