आकाश चव्हाण | तेरणा काठ प्रतिनिधी, धाराशिव
तेरणा काठ वृत्तसेवा — शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, केंद्र शासनाने विकसित केलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार असल्याची माहिती तहसील कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने देण्यात आली आहे.
तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी यासंदर्भात सर्व पात्र लाभार्थ्यांनी उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन विहित कालावधीत हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. संबंधित योजनांमध्ये वृद्ध, निराधार महिला-पुरुष, विधवा, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती तसेच अनाथ बालकांचा समावेश आहे.
यापूर्वी लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत होते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व आजारी लाभार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने B.S.L.A.E. ही ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.
या सुविधेअंतर्गत लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे अथवा नातेवाईकांच्या सहाय्याने हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकतात. तसेच ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
तथापि, विहित मुदतीत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचा योजनांअंतर्गत मिळणारा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments