तेरणा काठ वृत्तसेवा | धाराशिव : दाऊतपूर येथील तेरणा नदीपात्र परिसरात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या वाळूवर महसूल प्रशासनाने कारवाई करत अंदाजे २० ब्रास वाळू जप्त केली आहे. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मौजे दाऊतपूर येथील गट क्रमांक १५८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी तहसील कार्यालयाला दिली होती. त्यानंतर प्राप्त माहितीची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी तातडीने नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या विशेष पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले.
महसूल पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता अंदाजे २० ब्रास वाळूचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान संबंधितांकडे कोणतीही वैध रॉयल्टी पावती, वाहतूक परवाना अथवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महसूल विभागाने पंचनामा करून संबंधित वाळूसाठा ताब्यात घेतला.
या प्रकरणी लागू असलेल्या महसूल व गौण खनिज नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व साठेबाजी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
धाराशिवमध्ये रुजू झाल्यापासून तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी अवैध गौण खनिज उत्खनन, महसूल बुडविणारे प्रकार आणि बेकायदेशीर साठेबाजीविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
◼ कारवाईची ठळक वैशिष्ट्ये
✔ तक्रारीची तातडीने दखल
✔ बैठकीतून थेट कारवाईचे निर्देश
✔ दाऊतपूर येथे विशेष महसूल पथकाची धडक
✔ अंदाजे २० ब्रास वाळू जप्त
✔ पंचनामा करून वाळूसाठा ताब्यात
✔ पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू
◼ तेरणा काठ न्यूज विशेष
"कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान" या तत्त्वानुसार महसूल प्रशासनाने केलेली कारवाई अवैध गौण खनिज उत्खनन व साठेबाजी करणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments