Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा शाळेत प्रवेशोत्सव, नवागतांचे जल्लोषात स्वागत



तेरणा काठ वृत्तसेवा ---- कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे तसेच नवागतांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. *सैनिक हो तुमच्यासाठी- झाडे लावा झाडे जगवा* हे ब्रीद घेऊन माझी सैनिक संघटना कळंब यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये *देशप्रेम -राष्ट्रभक्ती* मूल्य रुजावीत यासाठी सदरील वह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा शाळेतील सर्व शिक्षकांच्या आर्थिक सहकार्यातून तीन हजार पाचशे रुपये किंमतीच्या वह्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फेटा बांधून व हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद आणि शाळेबद्दलची ओढ विशेष जाणवत होती.

शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड  यांनी शाळेला दहा पुस्तकांची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षण असलेल्या *भारतीय राज्यघटना* या पुस्तकाची प्रतही शाळेच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून प्रदान केली.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा, सदस्य तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. सहशिक्षक तुकाराम कराळे  यांनी केलेले आकर्षक फलकलेखन आणि सहशिक्षिका शिवानंद स्वामी  यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.


या प्रसंगी विद्यार्थिनी ईश्वरी कालिदास वायसे हिचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून तिने शाळेच्या ग्रंथालयासाठी दहा पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिक्षण, संस्कार, आनंद आणि सामाजिक सहभाग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने शाळेचे वातावरण चैतन्यमय झाले होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले, तर सूत्रसंचालन सहशिक्षक महादेव खराटे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहशिक्षक बलभीम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक बापू हगारे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments