Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’चा लाभ घ्या

 *जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे नागरिकांना आवाहन; ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’चा लाभ घ्या


तेरणाकाठ ,धाराशिव ,प्रतिनिधी.. आकाश चव्हाण..



महसूल व वन विभागांतर्गत तहसील कार्यालय, धाराशिव तथा महसूल मंडळ धाराशिव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. १ अंतर्गत शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता परिमल मंगल कार्यालय, धाराशिव येथे विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


सदर शिबिर हे धाराशिव शहर मंडळस्तरीय नागरी शिबिर असून धाराशिव शहर, सांजा, राघूची वाडी व जाधववाडी परिसरातील नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनामार्फत विशेष नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तात्काळ निपटारा, शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच लाभांचे वितरण यासाठी संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


तहसील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, शिबिरामध्ये फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, वारस नोंदी, ७/१२ व ८अ उतारे वितरण, विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण, शिधापत्रिका दुरुस्ती, ई-पीक पाहणी, ई-मोजणी, डिजिटल ७/१२ संदर्भातील जनजागृती तसेच जमीन व्यवहार व तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


याशिवाय मुख्यमंत्री बलिराजा शेत रस्ते योजना, पीएम किसान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन करून पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


सदर शिबिरात महसूल विभागासोबत नगर रचना विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, आरटीओ विभाग, महावितरण, जिल्हा रोजगार कार्यालय, तालुका आरोग्य विभाग, नगर परिषद, उमेद अभियान, बाल विकास प्रकल्प कार्यालय, पोस्ट विभाग तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा, मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.


जिल्हाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार व उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून शासनाच्या सेवा सुलभ, पारदर्शक व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments