तेरणा काठ वृत्तसेवा --- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांना Swiftnlift या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. औंध येथील भारतरत्न भीमसेन जोशी कला मंदिर येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार समारंभात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
प्रा. सोमनाथ लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नीट (NEET) ऑनलाइन टेस्ट सिरीज, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींबाबत योग्य दिशा देण्याचे कार्यही ते करत आहेत.
श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, टेस्ट सिरीज, करिअर काउन्सेलिंग व प्रोत्साहित करणारे व्याख्याने यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण क्षेत्रात दिलेले हे योगदान आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य लक्षात घेऊन Swiftnlift संस्थेने त्यांची ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली.
या सोहळ्याला कंपनीचे सीईओ निलेश साबे, येवले ग्रुपचे डायरेक्टर नवनाथ येवले, पुणे भाजपाच्या सरचिटणीस सौ. प्रियांका शेंडगे-शिंदे, सौ. उषाताई सोमनाथ लांडगे यांच्यासह शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. सोमनाथ लांडगे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि सहकाऱ्यांचा आहे. त्यांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
प्रा. सोमनाथ लांडगे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments