तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोयीनुसार महाविकास आघाडी करण्यात आली आणि अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजीमुळे एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करण्यात आले. याचाच थेट फटका आघाडीला बसल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की, काही ठिकाणी आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढले, तर काही मतदारसंघांत समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून आला. जागावाटपात पारदर्शकता नव्हती आणि स्थानिक स्तरावर व्यक्तिकेंद्री निर्णय घेतले गेले. परिणामी महाविकास आघाडीतीलच पक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार दिले आणि पारंपरिक मतांचे विभाजन झाले.
त्यांच्या मते, ही केवळ निवडणुकीतील चूक नसून संघटनात्मक अपयश आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी चर्चा न करता घेतलेले निर्णय आणि गटबाजीला खतपाणी घालणारी भूमिका यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. प्रतिस्पर्धी पक्षांना याचा थेट फायदा झाला.
“आघाडी म्हणजे केवळ नावापुरती एकजूट नसते; ती विचारांची, रणनीतीची आणि शिस्तीची असते. मात्र येथे सोयीचे राजकारण करण्यात आले. त्यामुळे जनतेने मतदानातून स्पष्ट संदेश दिला,” असे राऊत यांनी नमूद केले.
आगामी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करून अंतर्गत मतभेद दूर करणे, स्पष्ट धोरण आखणे आणि सर्व समाजघटकांना न्याय्य प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यातही अशाच परिणामांना सामोरे जावे लागेल,असे राजाभाऊ राऊत यांनी म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments