तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्ह्यात अफूच्या अवैध शेतीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील तर कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथेही अफूची शेती उघडकीस आली आहे. कन्हेरवाडी येथील विलास नवनाथ कवडे यांच्या शेतामधून तब्बल 100 किलो वजनाचे अफू पीक जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कळंब पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कन्हेरवाडी ते मांडवा रोडलगत गट क्रमांक 316 मधील शेतात अफूची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर व अप्पर पोलीस अधीक्षक शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी तातडीने पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर यांनी दिली.अवैध अंमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments