Type Here to Get Search Results !

धाराशिव बसस्थानकातील एनसीएमसी कार्ड व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; एस. एस. माळी यांचा पार्किंग ठेकाही रद्द करा!



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव बसस्थानकातील एनसीएमसी कार्ड एजन्सीच्या कामकाजातील कथित अनियमितता, अधिकृत मशीन व आयडीचा बसस्थानकाबाहेर होत असल्याचा आरोप असलेला वापर, ग्राहकांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आणि पार्किंग ठेक्याच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकशीत अनियमितता सिद्ध झाल्यास एनसीएमसी एजन्सीची मान्यता रद्द करून एस. एस. माळी यांचा पार्किंग ठेकाही नियमानुसार रद्द करावा, अशी आक्रमक मागणी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यापूर्वी दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन देऊनही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

धाराशिव बसस्थानकात अधिकृत एनसीएमसी कार्ड एजन्सी उपलब्ध असताना बसस्थानकाबाहेर उस्मान टी हाऊससमोर, सम्राट बिअर बारजवळील एका छोट्या टपरीमध्ये एनसीएमसी कार्ड काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या ठिकाणी शैलेश शेंडगे यांच्या नावावरील अधिकृत आयडी व मशीनचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित मशीनचे लोकेशन, आयडी लॉगिन, व्यवहारांच्या नोंदी, कार्ड वितरणाची संख्या आणि ग्राहकांकडून आकारलेल्या शुल्काची तांत्रिक तपासणी करावी. अधिकृत मशीन बसस्थानकाबाहेर वापरण्यास परवानगी होती का, संबंधित ठिकाणी व्यवसाय चालविण्यास आवश्यक मान्यता होती का आणि या व्यवहारांमधून नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा स्पष्ट खुलासा महामंडळाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पार्किंग ठेकेदार एस. एस. माळी यांचा एनसीएमसी एजन्सीशी नेमका संबंध काय? हा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पार्किंगचा ठेका असलेले एस. एस. माळी हे एनसीएमसी कार्ड एजन्सीमध्ये वारंवार का उपस्थित असतात, अधिकृत एजन्सीकडे येणाऱ्या ग्राहकांना खासगी ठिकाणी पाठविले जाते का आणि ग्राहकांकडून अंदाजे ३०० ते ४०० रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारींमध्ये कितपत तथ्य आहे, याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकृत एजन्सी अनेकदा बंद राहत असल्याची तक्रारही करण्यात आली असून, एस. एस. माळी यांच्याविरोधातील पूर्वीच्या तक्रारी आणि कथित दंडात्मक कारवाईच्या नोंदी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:४५ वाजता एस. एस. माळी हे अधिकृत एनसीएमसी एजन्सीमध्ये उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, त्यासंदर्भातील छायाचित्रही निवेदनासोबत जोडण्यात आले आहे. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत चौकशीतून पडताळणी होणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सम्राट बिअर बारजवळील परिसरात हा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जागेची पाहणी करून महिला, मुली आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच, एनसीएमसी कार्डसाठी निर्धारित शुल्क किती आहे, प्रत्यक्षात किती रक्कम आकारली जाते, ग्राहकांना अधिकृत पावत्या दिल्या जातात का आणि महामंडळाच्या नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी. केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी, व्यवहारांच्या डिजिटल नोंदींचे परीक्षण आणि संबंधित ग्राहकांचे जबाब नोंदवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक (वाहतूक), विभागीय नियंत्रक, धाराशिव, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री व परिवहन मंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनावर कोणती कार्यवाही करण्यात आली, चौकशी कोणत्या स्तरावर आहे आणि दोषींविरोधात कोणती कारवाई प्रस्तावित आहे, याचा लेखी अहवाल द्यावा. चौकशीत अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित एनसीएमसी एजन्सीची मान्यता व आयडी रद्द करून एस. एस. माळी यांचा पार्किंग ठेका नियमांनुसार रद्द करावा. अन्यथा या प्रकरणाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंबेडकरवादी पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक विकास बनसोडे, कामगार आघाडीचे नेते आनंद भालेराव, आरपीआय (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजा राऊत, आरपीआय (डे)चे राज धज, आरपीआय (आठवले)चे तालुकाध्यक्ष भालचंद्र काठारे, सुनील वाघमारे, पुष्पकांत माळाळे आणि सुमेध वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments