Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत निवडणुकीला वेग :;: प्रभाग रचनेची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यावर भर



तेरणा काठ वृत्तसेवा --- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश जारी करून जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील सुधारित तरतुदींनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी त्या क्षेत्रात कोणतेही बदल करता येत नसल्याने प्रभाग रचनेची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचना करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या समितीद्वारे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे.


प्रथम टप्प्यात गावांचे नकाशे तयार करून प्रभागांची सीमा निश्चित केली जाईल. त्यानंतर समितीमार्फत तपासणी करून प्रस्ताव उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल. यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. ४ मे २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments